तुम्हाला अस गाव माहिती आहे का जिथे वेगवेगळ्या जातीची, धर्माची, पंथाची एवढच नाही तर नागरिकत्वाची लोक गुण्यागोविन्दानी एकत्र राहतात. इथे लोक व्यवसाय, नोकरी हे त्यांचा बँक balance वाढवण्यासाठी करत नाहीत तर त्यांच्या अगदी मुलभूत गरजा भागवण्यासाठी करतात… इथे सर्वाना समान वेतन मिळते.. अगदी डॉक्टर पासून बेकरीत काम करणाऱ्या माणसापर्यंत! त्यामुळेच एखाद्या शर्यतीत धावल्याप्रमाणे आयुष्य न जगता शांत, सुखी आणि महत्वाचे म्हणजे समाधानी आयुष्य इथे लोक जगतात. इथे कुठलीच मूर्तीपूजा होत नाही फक्त आत्मिक शांतीसाठी ध्यानधारणा होते..
इथली हवा प्रदूषणमुक्त आहे..इथे लोक सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला भाजीपाला खातात.. इथले नागरिक रोजच्या जीवनात रोखीचे आर्थिक व्यवहार करतच नाहीत!
असे हे एवढे अनोख्या जीवनशैलीचे गाव आहे तरी कुठे? माहितीये का तुम्हाला?
तर हो.. अस गाव खरच आहे..अगदी आपल्या भारतातच आहे! चेन्नईपासून 160 किमी अंतरावर.. त्याच नाव आहे ओरोवील!!
मग काय ह्या इतक्या नाविन्यपूर्ण संकल्पनेवर वसलेल्या गावाला भेट द्यायची उर्मी काही स्वस्थ बसू देईना!!
डिसेंबर, जानेवारी हा इथे यायचा चांगला ऋतू आहे.. कारण उन्हाचा तडाखा कमी असतो..आणि हवाही कोरडी असते..तर असाच एक weekend पकडून आम्ही pondicherry गाठले! pondicherry हे चेन्नई पासून १५० किमी वर आहे. आणि ओरोवील हे pondicherry पासून १६ किमी वर आहे..बस रिक्षा किंवा कॅब ने पोंडी पासून ओरोवीलला सहज जाता येते.
ओरोवील हे काही खरतर ‘typical tourist spot’ नाहीये…पण इथे बघण्यासारख्या..अनुभवण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत.. त्यातल्या त्यात सर्वांनी नक्की पाहाव्या अशा गोष्टी म्हणजे..
- मातृमंदिर
- स्वरम musical instruments factory
- ओरो बीच
- फ्रेंच पदार्थ मिळणाऱ्या बेकरीज आणि कफेज
- अभिनव वास्तुकलेचा अविष्कार असणाऱ्या वेगवेगळ्या इमारती
ह्या व्यतिरिक्त इथे अनेक उपक्रम, कार्यशाळा वर्षभर चालू असतात.जे ७ दिवसांपासून अगदी २-3 महिन्यांचे असतात. ह्यात योग, कला, हस्तकला, शिल्पकला, pottery ई. शिकवतात.
तर pondicherry तल्या प्रसिद्ध rock beach जवळच आम्ही हॉटेल घेतले. कारण पहाटे उठून समुद्रातून होणारा सूर्योदय आम्हाला चुकवायचा नव्हता. भारताच्या पश्चिम किनारपट्टी जवळ राहत असल्यामुळे नेहमी समुद्रात सूर्यास्तच पाहत आले आहे..त्यामुळे आता त्या अथांग समुद्रातून केशरी गुलाबी रंगांची उधळण करत भारदस्त आगमन करणारा सूर्यदेव पाहायला आम्ही खूप उत्सुक होतो!! सुर्योदायची वेळ बघून गजर लावून पहाटेच उठलो..कॅमेरे सरसावून beach च्या दिशेने निघालो.. अंधारात आकाशात थोडे ढग दिसले..आणि मनात पाल चुकचुकली!! beach वर पोचलो तर आमच्या सारखीच अनेक लोक आली होती. दूरवरून परत येणारी मासेमारीला गेलेली जहाजे दिसत होती. काल रात्री सुटलेला बेभान वारा आता शांत झाला होता..समुद्राच्या लाटा संथ लयीत एकामागून एक किनार्याच्या भोज्याला शिवून जात होत्या.. आमचे डोळे मात्र क्षितीजावर दाटून आलेल्या ढगांच्या मागे पसरलेल्या अस्पष्ट लाली वर खिळले होते..मनोमन वाटत होते की आत्ता हे ढग विरावेत आणि सूर्योदय दिसावा!!! पण कसचा काय..आधी भुरूभुरू आणि मग जोरात असा पाऊस सुरु झाला..खूप धावपळ करत आडोसा गाठला.. better luck next time असा स्वतःला समजावत खट्टू मनानी परत निघालो..
हॉटेल वर येऊन आवरून सकाळी 9 वाजता ओरोवील च्या दिशेने गाडीने निघालो. आता पाऊस थांबला होता.आणि ऊन पडले होते. pondicherry हे इथल्या फ्रेंच वसाहती साठी प्रसिध्ध असल्यामुळे वाटेत खूप सुंदर फ्रेंच धाटणीची घरे पाहायला मिळाली. साधारण १५-20 मिनिटात ओरोवील ला पोचलो.मुख्य रस्ता सोडून डाव्या बाजूला वळल्यावर लगेचच दोन्ही बाजूला जंगल सदृश झाडांची गर्दी दिसू लागली. पहिलाच मुक्काम ‘Bread & Chocolate’ ह्या फ्रेंच बेकरी पदार्थांसाठी प्रसिद्ध असलेल्या café त केला.इथे ताजे bake केलेले आणि अतिशय चविष्ट ब्रेड केक, healthy ब्रेकफास्ट bowls, croissant खूप छान मिळतात. खवय्ये लोकांसाठी इथे थांबणे म्हणजे पर्वणीच आहे.
पोटपूजा केल्यानंतर निघालो मातृमंदिर च्या दिशेनी..एका मोठ्या पार्किंगच्या जागेत गाडी पार्क करून चालत पोचलो ते visitors centre मध्ये! पोंगल चा सण असल्यामुळे बरीच गर्दी होती.झाडांच्या गर्दीत असलेले हे centre उघड्या वीटकामात पर्यावरणपूरक साहित्य वापरून बांधलेले आहे.तिथे डाव्या बाजूला shopping centre आणि कॅन्टीनस आहेत तर उजव्या बाजूला मोठा प्रदर्शनाचा hall आहे.तिथे ओरोवील बद्दलची माहिती व photos आहेत. मातृमंदीरची प्रतिकृती ठेवली आहे. दोन अजून hall आहेत तिथे १० मिनिटाच्या दृकश्राव्य फिती दाखवल्या जातात.ज्यात श्री अरबिंदो यांचा आणि ओरोवील बद्दलचा इतिहास थोडक्यात सांगितला जातो.
आम्ही दोन्ही चित्रफिती बघितल्या. ओरोवील चा इतिहास खरच रंजक आहे. ओरोवील हि एक experimental,universal township आहे. तामिळनाडू राज्यातील विलुपुरम ह्या जिल्ह्यात याचा काही भाग येतो तर काही भाग हा union territory of pondichery त येतो. ह्याची स्थापना १९६७ साली मीरा अल्फासा (popularly called “the mother’)यांनी केली. मीरा ह्या श्री अरबिंदो ह्यांच्या शिष्या होत्या. अरबिंदो हे क्रांतिकारक, द्रष्टे, तत्वन्यानी होते. त्यांना जातीधर्मा पलीकडचा आणि मानवतावादी दृष्टिकोनावर अवलंबून असा समाज निर्माण करायची इच्छा होती. त्यांच्या ह्याच संकल्पनेस पुढे नेत त्यांच्या नंतर मीरा यांनी ह्या township ची स्थापना केली. Roger Anger ह्या फ्रेंच architect नी ह्याला साकारले. ह्याला थोड्या प्रमाणात भारत सरकार व unesco चीही आर्थिक मदत मिळाली आहे. इथे वेगवेगळ्या ५२ देशाची जवळजवळ २५०० लोक राहतात. भारतीयान खालोखाल फ्रेंच जर्मन इटलीयन लोक इथे आहेत. 20 sq.kms. जागेत हे वसलेले आहे. ५० वर्षांपूर्वी अतिशय पडीक आणि रुक्ष असलेल्या अशा ह्या जमिनीचे आज जंगल वाटेल अश्या वनश्रीत रुपांतर झाले आहे. येथील नागरिकत्व हवे असल्यास एका १५ महिन्याच्या प्रवेश प्रक्रीयेतून जावे लागते. तरच आपण guest वरून newcomer आणि मग aurovillian बनू शकतो.
ह्या अभिनव प्रायोगिक तत्वावर वसलेल्या शहराला वास्तुकलेसाठी..renewable energy साठी..स्थापत्य कलेसाठी.. अनेक देशी विदेशी पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
मातृमंदिर बघण्याआधी हि सर्व माहिती घेतल्यामुळे ह्या जागेकडे बघायचा एक वेगळाच दृष्टीकोन मिळाला. मातृमंदिर आतून किंवा बाहेरून कसेही बघायचे असले तरी त्यासाठी पास घ्यावे लागतात. जे की मोफत आहेत. फक्त आतून बघण्यासाठी १-२ दिवस आधी येऊन पास घ्यावे लागतात. आमच्या कडे तेवढा वेळ नसल्यामुळे आम्ही बाहेरूनच बघायचे ठरवले. मातृमंदिर बाहेरून पाहण्यासाठी एक viewing point केला आहे. तिथे चालतच जावे लागते. दोन्ही बाजूला झाडी..मधूनच एखादे कलात्मक शिल्प…वेलींचे बनवलेले बोगदे.. असा साधारण १.५ किमी चा मातीचा रस्ता चालून गेल्यावर आपण पोहचतो एका भव्य वटवृक्षा पाशी! ५० मी. इतका मोठा व्यास असलेल्या ह्या वृक्षाला अनेक पारंब्या आहेत..ज्या की स्वतःच एकएक वृक्ष आहेत..आश्चर्याची गोष्ट म्हणजे 45 वर्षांपूर्वी जेव्हा ओरोविल् चे बांधकाम सुरु झाले तेव्हा या इतक्या मोठ्या पडीक जमिनीवर हा एकमेव वृक्ष उभा होता…आणि हाच वृक्ष आता ओरोवील चा भौमितिक मध्य आहे..सर्व शहर एका आकाशगंगेच्या संकल्पनेवर ह्याच्या भोवती वसले आहे.
इथून थोडेच पुढे गेल्यावर viewing point पाशी पोचलो..आणि समोर दिसला तो एक मोठा सोनेरी लखलखणारा गोळा..12 पाकळ्यांवर हलकेच विराजमान झालेला.. सोनेरी रंगाच्या छोट्या छोट्या चकत्यांनी बनलेला..आजूबाजूला हिरवाईने नटलेली बाग..आणि लांबवर एक amphitheatre..पाहूनच मन प्रसन्न आणि शांत झाले. आणि उमगले मुद्दाम चिंतन करण्यासाठी इथे लोक का येत असतील.. इथे आत कोणतीही मूर्ती नाहीये..गोलाच्या मध्यभागी फक्त एक काचेचा गोळा आहे.. ज्यांना खरोखरीच मनापसून चिंतन करायचे आहे त्यांनी मन इथे एकाग्र करून आत्मचिंतन करणे अपेक्षित आहे..आणि तशी वातावरण निर्मितीही इथे केली आहे.त्यामुळेच नुसते बघायला येणाऱ्या पाहुण्यांपासून ध्यानाला बसलेल्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून ठराविक वेळा आणि पास याचे बंधन आहे. एवढी सुंदर कलाकृती आतून बघायची राहून गेली म्हणून थोडी हळहळ वाटली..
आता परत निघालो visitors centre च्या दिशेनी..थंडीचे दिवस असूनही उन चांगलेच तापले होते.. त्यावरून उन्हाळ्यात इथे किती गरम होत असेल ह्याची कल्पना आली..भूक लागल्यामुळे कॅन्टीन मध्ये जाऊन जेवणाची थाळी घेतली. जी बरीच वाजवी दरात होती..अनेक परदेशी लोकही ही थाळीच खात होते..
शेजारच्याच shopping centre मध्ये फेरी मारली. कपडे..दागिने..सुवासिक गोष्टी..पुस्तके..अशा अनेक छान गोष्टी होत्या पण खूप महाग होत्या..
आता निघालो स्वरम ह्या musical instruments च्या factory कडे..ओरोवील च्या आत सगळीकडेच मातीचे कच्चे रस्ते आहेत..गाडीचे GPS चालू केले..आणि google काकू सांगतील तशी कधी डावीकडे तर कधी उजवीकडे अशी वळणे घेत खूप वेळानी अडनिड्या रस्त्यानी एकदाचे पोचलो!!
स्वरम हि एक आगळीवेगळी वाद्यांची निर्मिती आणि संशोधन करणारी संस्था आहे. येथे जगभरातले अनेक वादक एकत्र मिळून वाद्यांची आणि वादनाची एक वेगळीच परिभाषा शोधत आहेत. येथे वाद्य तयार करण्यासाठी निरनिराळ्या साहित्याचा वापर केला जातो. येथे वाद्यांचा उपयोग हा नादनिर्मिती बरोबरच उपचारासाठीही केला जातो. Aurelio हे ह्याचे संस्थापक आहेत त्यांना ३० वर्षाहून जास्त असा त्यांचा ह्यातील अनुभव आहे. त्यांच्या मते नाद हा फक्त कानांनी ऐकायचा नसून मनानी..आत्म्यानी.. अनुभवायचा असतो.. येथे नादनिर्मिती करणारी अनेक अनोखी वाद्य पाहिली. एक मोठा granite दगड एका विशिष्ठ पद्धतीने कापून ठेवला आहे.. आणि त्यावर आपले हात पाण्याने ओले करून जेव्हा फिरवतो तेव्हा सुंदर सुरावट ऐकायला येते. एका गोल डफली सारख्या डब्यात वाळू भरली आहे आणि ती डफली हळू हळू तिरकी केली की समुद्राच्या लाटांचा आवाज येतो. एका मोठ्या घंटेमध्ये अडकवलेल्या spring ला पीळ देवून हलकेच सोडले की हुबेहूब वादळ घोंगावत येत असल्याचा आवाज येतो..कवड्या किंवा शिंपल्याच्या माळांना हलवले असता त्यातून निघणारा आवाज हा अक्षरशः पाण्याच्या धबधब्यासारखा येतो..हे सगळे खूप अदभूत आहे..ह्या नादलहारींमागे शास्त्र आहे.. आणि ह्याचाच वापर करून इथे sound healing म्हणजेच उपचारही केले जातात. हे नक्कीच अनुभवण्यासारखे आहे. Sound healing treatment घेण्यासाठी आधी वेळ निश्चित करावी लागते.
येथे ह्या सर्व वाद्यांची विक्रीही होते. समोरच वाद्यांची एक बागही आहे. हि मात्र सशुल्क आहे. येथे शास्त्रीय पद्धतीवर आधारित वाद्यांची खेळणी आहेत.
ह्या आवाजाच्या अनोख्या दुनियेत आम्ही खूप वेळ रमलो.. आणि मग परतीच्या वाटेला निघालो. येथे सर्वच दुकाने हॉटेल्स हि लवकर म्हणजे अगदी ५ वाजताच बंद होतात. खूप दाट झाडी असल्यामुळे अंधार हि लवकर पडतो. जाताना परत bread and chocolate हे सकाळचे कॅफे लागले.. सकाळी खालेल्या croissant ची चव अजून जिभेवर रेंगाळत होती..आपसूक गाडी तिथे थांबली..आत जाऊन पहिले तर सर्व पदार्थ संपले होते..शेवटचा cinnamon रोल राहिला होता..तो लगेच घेतला.. आणि तिथेच भेट झाली एका फ्रेंच तरुणाची.. तो ह्या कॅफेचा ५ partner पैकी एक पार्टनर होता. त्याच्याशी गप्पा मारून ओरोवील बद्दल खूप गोष्टी कळल्या. तो म्हणाला ओरोवील च्या नियमाप्रमाणेच तो व त्याच्या सर्व parteners ना २०००० रु. महिना पगार मिळतो. हे कॅफे जास्त नफा कमावण्यासाठी ते चालवत नाहीत. दररोजचे ठरवलेल्या प्रमाणाचेच पदार्थ ते बनवतात. जास्त विकले जातायत म्हणून अजून बनवा..अजून शाखा काढा ..अजून पैसा कमवा.. हे त्यांना मान्य नाही.. छान वाटले ऐकून.. पैशाच्या मागे धावणाऱ्या ह्या युगात हे विचार खूप आवडले. हे सर्व जण वेगवेगळ्या देशातून इथे ओरोवील मध्ये येऊन राहत आहेत.
खरतर इतके काही वेगळे आज दिवसभरात पहायला.. अनुभवायला मिळाले होते.. तरी खूप काही बघायचे राहिले होते..पण वेळेच्या बंधनामुळे आता ओरोवील ची रजा घ्यायला लागत होती..पण परत लवकरच यायचे हे ठरवून आम्ही परत pondicherry च्या दिशेनी निघालो.
फ्रेंच संस्कृती चा छाप असलेले पोंडीचेरी पण खूप छान आहे..त्याविषयी पुढच्या blog मध्ये..





































